Thursday, April 12, 2012

श्री.बालाजीची व सोनई मंदिराची माहिती

श्री व्यंकटेश देवस्थान सोनई जि. अहमद नगर, महाराष्ट्र राज्य : या देवळाची माहिती.
श्री व्यंकटेश म्हणजे श्री भगवान विष्णूचा अवतार. श्री रामाने, श्री कृष्णाने जसे अवतार घेतले तसा हाही एक अवतार.
श्री क्षेत्र सोनई येथे सु. ५०० वर्षाहून आधीचे पुरातन श्री व्यंकटेश( बालाजी) मंदिर आहे.
पुणे औरंगाबाद रोडवरील घोडेगांव पासून ८ किलोमीटर अंतरावर व सुप्रसिद्ध श्री शनी शिंगणापूर पासून ३ किलोमीटर अंतरावर सोनई गावात पुरातन हे मंदीर आहे. हे मंदीर जागृत देवस्थान आहे, व तशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे व अनुभवही भक्तांना आले आहेत.
श्री बालाजीच्या सात प्रभावळी मध्ये गोपाल कृष्ण व विठोबाच्या रूपातील मूर्तीसह सुंदर मनोहर मूर्ती आहेत. शंख चक्र, पद्म व जागृत शाळीग्राम आहेत. तसेच श्री गणेश, गोपालकृष्णच्या मूर्ती आहेत. देवस्थानचे निरनिराळे उत्सव होत असतात. चैत्रीचा मुख्य उत्सव दरवर्षी उत्तम रीतीने पार पडतो. श्रीची पालखी निघते. अभिषेक, पूजा इ. धार्मिक कार्यक्रम होतात. प्रवचन कीर्तन इ. कार्यक्रम होतात.
सर्व प्रांतातून भक्तगण मोठ्या संखेने येतात व दर्शनाचा तसेच प्रसादाचा लाभ घेतात. दरवर्षी श्री व्यंकटेश(बालाजी) चा चैत्रीचा उत्सव द्वादशी ते पौर्णिमे पर्यंत साजरा होतो. द्वादशीला मुख्य मंदिरातून देव उत्सवाचे जागेत आणले जातात. उत्सवात देव तेथेच विराजमान असतात. उत्सवात मंडप टाकला जातो. ज्यांनी पंगत घेतली त्यांचे तर्फे भक्तांना दुपारी प्रसाद वाटला जातो. तसेच भक्तांकडून दर्शनाला येणाऱ्याना श्रीच्या चरणी अर्पण करून शेरनीचा(गुळाचा) प्रसाद वाटला जातो. द्वादशीला श्री बालाजी रात्री १२ चे सुमारास तिरुपतीवरून उत्सवासाठी व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. रात्री १२ नंतर येतात म्हणून रात्री १२ नन्तर श्री बालाजीची आरती होते नंतरच भक्तांना महानैविदयाचा प्रसाद दिला जातो.
शिवाजी महाराज्याच्या वंशातील राजाराम महाराज व त्यांचे सैनिकांना श्री गोसावी(साबळे) यांचे पूर्वजांनी गोसाव्यांचा भगवा वेश देऊन परकीयांपासून वाचवले व त्यांचा वेश घालून परकीयांचा मार खाल्ला. म्हणून सध्याची देवळाची जागा व शेती इनाम म्हणून राजाराम महाराजांकडून मिळाली आहे. परंतु शेती करणारे उत्पन्न देत नाहीत व शेतीही परत करत नाहीत. त्यामुळे उत्पन्नाचे साधन नाही. श्री जगन्नाथ गोविंद गोसावी यांनी गोसावी आडनाव ते तिरुपतीला नियमित जात असलेने लावले आहे. इतर भाऊबंद साबळे आडनाव लावतात.

श्री बालाजी सोनईला कसे आले याबद्दलची आख्यायिका आहे ती अशी:

श्री. गोसावी(साबळे) घराण्यातील पूर्वज श्री रामजी व त्यांचे भाऊ यांनी श्री बालाजी यांना प्रसन्न करण्यासाठी सोनई येथे अनुष्ठान केले. त्यांना देव प्रसन्न झाले,तेंव्हा त्यांनी श्री बालाजी यांना सोनई येथे निवास करण्यासाठी आग्रह केला. पाच भावांनी मला नेण्यासाठी तिरुमला येथे यावे असा आदेश श्री बालाजींनी दिला त्याप्रमाणे श्री रुद्राजी, श्री भिकाजी, श्री चिंतामणी, श्री जगन्नाथ व श्री रामजी या पूर्वजांनी तिरुमला (तिरुपती) येथ घोड्यावरून जावून श्री बालाजींना सोनई येथे येण्याची विनंती केली. त्याप्रमाणे देव प्रसन्न झाले व तिरुमला वरून सोनईस येण्यास संमती दिली पण अट घातली कि मी येतांना मागे वळून माझेकडे पहिले तर जिवंत समाधी घ्यावी लागेल. परंतु वरील सर्वांनी गावाच्या शिवेवर आल्यावर चिंतामणी बागेत (सध्या जेथे सोनई बस स्थानक आहे) मागे वळून पाहीले व श्री चे दर्शन घेतले व पैकी ४ जनांनी कृपादृष्टी झाल्यावर जिवंत समाधी घेतली. परंतु सर्वानी क्षमा याचना करून एकास जिवंत ठेवून श्री बालाजी यांचे सेवेसाठी सोनईत येवू देण्याची विनंती केले त्याप्रमाणे श्री रुद्राजी श्रीचे सेवेत रुजू झाले. त्यानुसार श्री बालाजी दरवर्षी चैत्र शुद्ध द्वादशीला रात्री १२ नंतर उत्सवासाठी तिरुमला वरून घोड्यावरून येतात व त्यावेळी जोराचा वारा वाहू लागतो. श्री रुद्राजीच्या वंशातील १२ वी पिढी मध्ये कै. जगन्नाथ गोविंद गोसावी(साबळे) यांनी श्री बालाजीची तिरुपती येथे उत्सवात जावून मनोभावे ६१ यात्रा पूर्ण केल्या, त्यांना तेथे पूजा करण्याचा अधिकार तसेच मान सन्मान मिळत असे.ते जागोजागी भक्तांकडे जावून श्री बालाजीची समाराद्न्या(महापूजा ) करत व तिरुपतीचे हळद कुंकू व प्रसाद मंत्र म्हणून देत असत. त्यानंतर सध्या त्यांचा मुलगा मनोहर हा यात्रा करत आहे. आता पर्यंत त्यांनी २४ यात्रा पूर्ण केल्या आहेत व तेथे हि भक्तांना मनोहर( प्रसाद) वाटत आहे. श्रीच्या कृपेने व वडीलांच्या आशीर्वादाने त्यांना ज्योतिषाचे वडिलांप्रमाणेच ज्ञानही प्राप्त झाले आहे. या घरण्यातील पूर्वजांनी अत्तापार्यात १००० हून आधी यात्रा पूर्ण केल्या आहेत. कै जगन्नाथ गोविंद गोसावी यांना व्यंकटेश स्त्रोत्राचे ओलीतीने पारायण केल्यानंतर नगरच्या त्यांचा खाजगी बालाजी मंदिरात श्री बालाजीने दर्शन दिले असा अनुभव त्यांनी स्वतः त्यांचे थोरले चिरंजीव श्री. श्रीनिवास यांना सांगितला होता. तसेच त्यांच्या अचूक ज्योतिषाबद्दल श्री श्रीनिवास यांनी स्वतः अनुभव घेतला होता व अनेक भक्तांना, ते जेथे पूजा करीत, अनुभव आले आहेत.

पाचही दिवस भक्तांना महाप्रसाद दिला जातो. चतुर्दशीला रात्री सु. ८ वाजता मंडपातून श्रीची पालखी गावातून डफ, ढोल,ताशा, बंड लावून मिरवली जाते. श्रीचे विलोभनीय लाईट मधील कट आउट हि मिरवले जाते. गीरीवाराधारी गोविंदा , भक्तवत्सला गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा, पतित पावन गोविंदा, दिनदयाळा गोविंदा, संकटहरणा गोविंदा, याचा जयघोष करत श्री बालाजीची पालखीतून मिरवणूक काढतात. जागोजागी भक्तगण त्यांचे घरासमोर श्रीला ओवाळून दर्शन घेतात,व देवापुढे प्रसाद ठेवतात . पालखी, सोनई गावातील मंडपातून भक्तांकडे जात, श्री गोसावी यांचे समाधीकडे जाते, तेथे समाध्यांना आरती होते व नंतर हळबारवावर अभिषेकासाठी येते, तेथे अभिषेक होतो व आरती करतात व नंतर सोनईच्या पेठेतून पालखीची मिरवणूक काढतात नंतर पालखी राम मंदिरात नेतात व तेथेही आरतीहोते. पेठेतील वेशीतून परत येतांना अनेक भक्तगण गावातील वेशीपर्यंत असंख्य वेळा रस्तावर श्री ला साष्टांग नमस्कार घालतात . रस्ते अक्षरशः भरून जातात. नंतर पालखी मंडपात येते. त्यानंतर देवळाच्या वरील गच्चीवरून भक्तांना पोळीचे श्रीला ओवाळलेल्या तुकड्याचा वर्षाव भक्तांकडे केला जातो व ते भक्तगण पदरात किंवा हातात झेलून घेतात, व घरी धान्यात किंवा तिजोरीत ठेवतात.त्यामुळे लक्षीमीची कृपा होवून वाढ होते अशी सर्वाची श्रद्धा आहे. नंतर भक्तगण मंडपात आपापला प्रसाद देवापुढे ठेवतात,त्याचा नेवीद्य दाखवून आरती होते. पूर्वी केलेल्या सेवेप्रमाणे सेवेकरीला मानासाठी श्रीफळ(नारळ) दिले जाते. तसेच श्री समोर कानगी भक्त ठेवतात व त्यासाठी प्रसाद स्वरुपात नारळ दिला जातो. पुढील वर्षाच्या दररोजच्या पांच दिवसाच्या व गोकुळाष्टमीच्या पंक्तीसाठी चीठ्या टाकून ठरवलेल्या निकषानुसार निवड केली जाते. मागील वर्षी व या वर्षी ज्यांना पंगत मिळाली त्यांचा श्रीफळ देवून सत्कार केला जातो. सेवेप्रमाणे,पालखीवाले, माडीवाले, निशाणवाले,रंगवाले, हारवाले, वस्रवाले, मंडपवाले, भालदार चोपदार,नंदादीपवाले यांना नारळ दिले जातात. उत्सवाच्या शेवटच्या दिवसाची पौर्णिमेची पंगत मोठ्या प्रमाणांत होते. नंतर पाडव्याला देव परत मुख्य मंदिरात अभिषेक होवून विराजमान होतात. तसेच गोकुळाष्टमी ,गोपाळकाला, नवरात्र इ. उत्सवही साजरे होतात. श्रीचे समोर उत्सवात भजन, प्रवचन ,ग्रंथपठण इ. कार्यक्रम होतात.

श्री बालाजीच्या महतीच्या कथा, आख्यायिका व प्रत्यक्ष अनुभव पूर्वीचे गावकरी भक्त सांगतात ते असे:

१. एकदा द्वादशीच्या रात्री १२ नंतर प्रसादाची पंगत फारच उशीरा होते म्हणून एका पंक्तीवाल्याने ती रात्री लवकर घालायचे ठरवले पण वाऱ्याने ती उधळून गेली, कारण देव रात्री १२ नंतर सोनईस येतात व आरती होवून उजव्या हातातील फूल खाली पडले की पंगत बसवायची अशी परंपरा आहे.
२. असे सांगतात कि एकदा पंक्तीवाल्याच्या मनात असूनही प्रसादावर वाढण्यासाठी साजूक तुपाची व्यवस्था होवू शकली नाही तेंव्हा आडातून पाण्याची घागर काढून त्यावर तुळशीपत्र ठेवून देवाची प्रार्थना करून असा संकल्प सोडला कि हे पाणीच आम्ही अन्नशुद्ध म्हणून भातावर वाढणार, तर वाढतांना त्या घागरीतील पाण्याचे तूप झाले.
३. कै. पद्माताई गोसावी (सद्य विश्वस्तांच्या मातोश्री) यांनी ४५ वर्ष सोनई येथे श्री बालाजीची सेवा केली. उत्सवाची व सणांची त्यांना संपूर्ण माहिती होती. सर्वांना मार्गदर्शन करून त्या उत्सवात मोठ्या हिरीरीने भाग घेत असत. तसेच उत्सव व्यवस्थितपणे पार पाडत. पती निधनानंतर उत्सव कसा पार पडणार या विवंचनेत त्या होत्या, त्या रात्री देवाने त्यांना दृष्टांत दिला. श्री लक्ष्मी नारायण प्रत्यक्ष स्वप्नात आले व काही काळजी करू नका, आम्ही दोघेही दरवर्षी उत्सवात येणार आहोत असे सांगितले. त्यानंतर दुसरे दिवशी शेषशायी भगवान नागाने त्यांना देवळाच्या प्रदक्षिणेच्या वाटेत दर्शन दिले. श्री शेष अजूनही अधून मधून प्रकट होवून दर्शन देतात.
४. कै. पद्माताई गोसावी यांनी सांगितलेला प्रत्यक्ष अनुभव असा. एकदा पूर्वीच्या मांडववाल्याने मंडप घालण्याची बिदागी जास्त वाढवून मागितली. ती दिली नाही म्हणून मंडप घालण्याचे नाकारले. तेंव्हा एक ब्यंडवाले आले व " मी मंडपाची व्यवस्था करतो" म्हणाले. व बरेच वर्षे तो मंडप होता. याचे कारण त्या ब्यंडवाल्याला पद्माताई गोसावी यांनी पूर्वी त्याचा त्याने गहाण टाकलेला ब्यंड सुटेल असे सांगितले होते व ते खरे झाले तर देवापुढे ब्यंड वाजव असे म्हणाल्या होत्या. "देवाची कृपा झाली तर मी ब्यंड वाजवीन असे त्याने कबूल केले होते,त्याप्रमाणे ब्यंड वाजवतो असे सांगायला तो आला होता.तेंव्हा मंडपाची त्याने स्वस्तात सोय केली. हि घटना सुमारे २५ वर्षापूर्वीची आहे.
५. कै. जगन्नाथ गोसावी यांनी तिरुपतीच्या यात्रेत कधीही खंड पडू दिला नाही एके वर्षी पद्माताई इतक्या आजारी होत्या कि डोळ्याने दिसत नव्हते व कानाने ऐकू येत नव्हते, शरीरातील पाणी संपत आलेमुले, अश परिस्थितीत डॉक्टर शरद राजहंस यांचेकडे त्यांची जबाबदारी टाकून ते यात्रेला निघून गेले. व १५ दिवसांनी यात्रेहून आल्यावर ते म्हणाले, "बालाजीने माझी सत्वपरीक्षा पहिली.मी जर यात्रेला गेलो नसतो तर तू जगली नसतीस."श्री. पद्माताई त्या १५ दिवसात बऱ्या झाल्या होत्या.
६. एकदा देवळाचा जीर्णोद्धार लवकर व्हावा म्हणून श्री. पद्माताई यांनी सारखे मनात येत होते म्हणून श्री. महाल्क्षीमी मंदिर कोल्हापूर येथे जाऊन पुजाऱ्याला देवीच्या पायावर अर्पण केलेला नारळ व सव्वा रुपया मागितला व देवळाचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून देवीकडे साकडे घातले. तेंव्हापासून मंदिर जीर्णोद्धारास सुरवात झाली आहे. देवीच्या पायाला स्पर्श केलेला सव्वा रुपया श्री बालाजीच्या गाभाऱ्यातील आसनात घालून सुरवात केली आहे. त्यामुळे गाभारा नुतनीकरण स्ल्याब सह व सभागृहाचे काम झाले आहे.श्री लक्ष्मीच्या कृपेशिवाय देवालाच जीर्णोद्धार होणार नाही असे त्यांना वाटत होते म्हणून त्या बुधवारी कोल्हापूरला गेल्या परंतु पुजाऱ्याने आधी नकार दिला व शेवटी हट्ट धरल्यावर शुक्रवारी येण्यास सांगितले होते. तोपर्यंत त्या देवळातच थांबल्या व नंतर नारळ व देवीला स्पर्श केलेला सव्वा रुपया घेवून सोनईस आल्या. व वरील प्रमाणे जीर्णोद्धारास सुरवात केली.
तसेच त्यांनी देवळाचे काम त्यांचे देखत पूर्ण व्हावे म्हणून देवळाच्या सभागृहात १०८ मेव्हुण जेवू घालण्याचा संकल्प केला. कै. नंदकुमार गोसावी यांनी तात्पुरती सोय केली व देवस्थानची जुने लाकडे यातून आलेल्या पैशातून देवळाचा स्ल्याब झाला. भिंती झाल्या पण त्याचे प्लास्टर व देवळाला फरशी नव्हती. अचानक झिम्बाब्वे स्थित श्री जयेशभाई शहा यांनी वस्तुरूप देणगी देवून तेही काम पूर्ण केले. श्री.श्रीनिवास गोसावी यांचे विनंतीवरून श्री चम्पूशेट भळगट यांनी देवळाला खिडक्यांचे व दाराचे ग्रील देणगी दिले. श्री अशोक कुलकर्णी यांनी पाक शाळेला स्वयंपाकाच्या जागेत शेड करून दिली.व पूर्ण झालेल्या देवळात श्री. पद्माताई यांनी १०८ मेहुणे घातली, व संकल्प पूर्ण केला. तसेच त्यांनी देवळात, पद्मपुराण इ. ग्रंथाचे पारायण केले. श्री व्यंकटेश विजयाची १०८ पारायणे पूर्ण केली.
७. सध्या तिरुपतीची दरवर्षी यात्रा करणारे श्री मनोहर गोसावी सांगतात कि एकदा २० वर्षापूर्वी श्री बालाजीचे काकड आरतीचे वेळी त्यांना देवळातील श्री गोपाल कृष्णाच्या मूर्तीने दृष्टीदर्शन दिले.तेंव्हापासून त्यांना सिद्धी प्राप्त होवून ज्योतिष शास्त्राचे विशेष ज्ञान प्राप्त झाले. त्यांना देवळात श्री शेष भगवाननेहि दर्शन दिले आहे
८. सद्य विश्वस्त श्री. श्रीनिवास गोसावी यांना त्रम्बक्येश्वर येथील कुशावर्त कुंडात, मागील सिंहस्थाच्या शेवटच्या दिवशी रात्री गोदावरीच्या आरतीचे वेळी २० फुटी श्री महादेवाचे, प्रथमच जेंव्हा आपल्या बालाजीच्या नवीन मंदिरातील गाभाऱ्यात यज्ञ करून देव नेले त्या दिवशी सोनई येथील महादेवाचे मंदिरात संध्याकाळी २ फुट उंच गदा धारी भगवान विष्णूचे व पुण्यातील नागनाथ पार जवळील महादेवाचे मंदिरात, गुरुचरित्र वाचल्यानंतर २ दिवसांनी ६ फुट उंच, बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाचे दृष्टीदर्शन झाले आहे.
९.एका भक्ताला विश्वस्त कै. जगन्नाथ गोविंद गोसावी यांनी देवापुधील नारळ प्रसाद म्हणून दिला व मुलगा होईल असे सांगितले."मुलगा झाल्यावर ५ नारळाचे तोरण बांधीन" असा नवस त्या भक्ताने केला, व त्याप्रमाणे त्यांना मुलगा झाला व त्यांनी चैत्रीच्या उत्सवात ५ नारळाचे तोरण बांधून केलेला नवस फेडला. म्हणून श्री बालाजी नवसाला पावतो अशी भक्तांची श्रद्धा दृढ झाली आहे.
श्रीक्षेत्र सोनई हे अनेक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.आता तेथे श्री राम मंदिर भव्य स्वरूपात बांधले जात आहे. आमचे बालाजी मंदिर पुरातन असून श्री शनी शिंगणापूर पासून ३ कि.मी वर, म्हणजे बसने ५ मिनिटांचे अंतरावर आहे. तसेच पुण्यावरून,पुणे औरंगाबाद रोड वरील घोडेगाव येथून १५ मिनिटांचे अंतरावर आहे. भक्तगण मोठ्या संख्येने उत्सवास उपस्थित राहतात. परप्रांतातूनही भक्तगण येतात. श्री बालाजी मंदिरापासून पुढे २ कि.मी. अंतरावर श्री रेणुकामातेचे मंदिर आहे व काचमहाल आहे. त्यामुळे शनी शिंगणापूर नंतर रेणुकामातेचे व श्री बालाजीचे दर्शन बहुसंख्य भक्तगण घेतात. तिरुपती सारखेच जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती व महती आहे.
श्री व्यंकटेश देवस्थान, सोनई हे एक भक्तांसाठी प्रार्थना मंदिर तर आहेच पण जगामध्ये एक आदर्श हिंदू संस्कृतीचे जतन करणे संस्कार केंद्र राहील अशा उद्देशाने विश्वस्त प्रयत्नशील राहणार आहेत. अध्यात्मिक,सांस्कृतिक पुस्तकांची सुसज्ज लायब्ररी, मोफत वैद्यकीय सेवा,गरीब विद्यार्थ्यांना वही पुस्तके वाटप, दानशूरांकडून या मंदिरात योजिले आहे. तसेच हिंदू धर्माचे अमोल संस्कार जतन करण्यासाठी प्रवचन, कीर्तन, श्लोक, मंत्र, पुरुषसुक्त,श्रीसूक्त,रामरक्षा,विष्णूसहस्रनाम पठण इ. धार्मिक कार्यक्रम नित्य होणार आहेत. तसेच भक्तनिवास,सुंदर फुलांची बाग इ. योजना आहेत. लोकवर्गणी, देणगी यातूनच हे शक्य आहे. देणगी हि हिंदू संस्कृतीच्या कार्यासाठी व श्री व्यंकटेश संप्रदायाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ही एक आपल्या व भावी पिढीला संस्कार क्षम करण्यासाठी व त्यांच्या कल्याणासाठी श्रेष्ठ गुंतवणूकच ठरणार आहे. असा विचार करून दानशुरांनी देवळाच्या जीर्णोद्धारास व या उद्द्येशपूर्तीसाठी हातभार लावावा असे आवाहन करण्यात येत आहे

श्री बालाजीच्या अनेक कथा प्रसिद्द आहेत.त्या थोडक्यात अश्या:

१. प्रसाद चोर पुजारीची कथा: एक पुजारी रोज चोरून प्रसाद खात असे, दुसऱ्याने तक्रार केली. पण हाताचे ठसे नाहीशे झाले व पुजारी चोरीच्या आरोपांतून श्री बालाजीच्या कृपेने निर्दोष सुटला व मनात बदल होवून सरळ मार्गे वागू लागला.
२. हुंडी चोराची कथा : एकदा एका चोराने एका भक्ताची श्री बालाजीची हुंडी त्या भक्ताला मारून चोरली. त्या चोराकडून श्री बालाजीने ती परत मिळवली व त्या भक्ताला परत केली. चोरानेही देवाची आराधना सुरु करून कष्टमय जीवन सुरु केले व चोरी करणे सोडून दिले. तिरुमलाई येथे जावून भक्ताने देवास हुंडी अर्पण केली. गावी येवून पाहतो तो त्याने देवाची प्रार्थना केली होती त्याप्रमाणे पाऊस पडून लोक आनंदाने कामात मग्न झाले होते.
३. एका खोमट्याची कथा: एका खोमट्याने तिरुमलाई येथे पायी जाऊन गोविंद गोविंद म्हणत पायऱ्या चढून बालाजीचे दर्शन घेतले व लोभी असून ही नंतर श्रीकृपेने लोभ सोडून दिला व दानधर्म करू लागला. कारण त्याला म्हाताऱ्याच्या रुपात आलेल्या श्रीनिवासाने दर्शन दिले. त्याची पोटदुखीही श्री श्रीनिवासाचे दर्शनाने कमी झाली,ज्यासाठी तो तिरुमलाई येथे गेला होता व पोटदुखी कमी होण्यासाठी नवस केला होता
४.एकदा कोर्टात जावून श्री.श्रीनिवासाने(भगवान बालाजीने) एका व्यापाऱ्याचे देणे वसूल करून दिले. त्यावेळी श्री बालाजीने एका दाढी असलेल्या म्हतारयाचे रूप घेतले. पैसे दिले असे खोटे कबूल करणाऱ्याने पैसे न देता कोठे ठेवले आहेत ते सांगितले. कोर्टाने जेंव्हा पहिले तेंव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले.
५. एक ब्राम्हण आपले स्वर्गवासी आईवडिलांच्या अस्थी गंगेत मिसळण्यासाठी आपल्या पत्नी व मुलासह निघाला. पण वाटेतच त्याची पत्नी गर्भवती झाली. त्यामुळे त्याने राजा तोडमल यास विनंती केली की कशी यात्रेहून परत येईपर्यंत मुलगा व पत्नी यांचा सांभाळ करावा. ती विनंतीही राजा तोडमलने मान्य केली पण शेवटपर्यंत देखभाल करण्याचे तो विसरला. उपाशी राहिल्याने त्या ब्राह्मणाची पत्नी व दोन्ही मुले मरण पावली. ब्राह्मण परत आल्यावर त्याला व राजालाही ही गोष्ट कळली. राजा श्रीनिवासला शरण आला व सारा वृत्तांत सांगितला, व ब्राह्मण्पापापासून विमुक्त होण्यासाठी प्रार्थना करू लागला. श्रीनिवासने दिव्य दृष्टीने सर्वे जाणले व स्वामी पुष्करणीच्या पूर्वे दिशेला असलेल्या सरोवरातील अमृतजल शिंपडून ब्राह्मणाची पत्नी व दोन मुलांना जीवित केले.

अशा श्री बालाजीच्या कितीतरी कथा आहेत. त्यांची महती सांगण्यास शब्द अपुरे पडतील. श्री व्यंकटेश बालाजीची मनोभावे सेवा करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होईल यात शंकाच नाही. सचोटीने वागा परमेश्वर साथ देईल. परिश्रमाने सर्व साध्य होईल.

सन्मतीशिवाय सत्कर्म नाही.                          सत्कर्माशिवाय समाधान नाही.
समाधानाशिवाय सार्थ जीवन नाही.              सार्थ जीवनाशिवाय सद्गती नाही .

श्रीनिवास गोसावी, विश्वस्त. फोन नं २०-२४४७५५७६ ,सेल नं. ९६०४८५३७६०



























No comments: